Home भारत - एक शोध कोल्हापूरात वसवलेल छोटंस पोलंड

कोल्हापूरात वसवलेल छोटंस पोलंड

by sinhasan

पोलंडच्या 5000 निर्वासित नागरिकांना कोल्हापूरच्या छत्रपती घराण्याने दिलेला आसरा ; दुसऱ्या महायुद्धा दरम्यानची घटना

दुसऱ्या महायुद्धात पोलंड उध्वस्त झाले होते. पोलंडमधून निर्वासित मोठ्या संख्येने इतर देशात जावू लागले होते. महायुद्धाचा भडका उडाला असताना हिटलरच्या नाझी सैन्याच्या नरसंहारातून स्वत:ची सुटका करून घेतलेले पोलंडचे हजारो नागरिक जीव वाचवण्यासाठी प्रयत्न करत होते. अनेक देशांनी आपल्या देशात निर्वासितांची सोय होणार नाही असे कारण सांगून आसरा देण्यास टाळले. पण अशावेळी भारताने मात्र या पोलंडच्या निर्वासितांना आसरा दिला. यामध्ये मदत करण्यात दोन संस्थाने पुढे होती एक गुजरातमधील जामनगर व दुसरे महाराष्ट्रातील कोल्हापूर संस्थान.

या दोन संस्थानांनी हजारो पोलिश निर्वासितांना आसरा दिला, त्यांना जगण्यास मदत केली. १९४३ च्या सुमारास कोल्हापुरात ५ हजार पोलिश निर्वासित आले आणि त्यांच्या राहण्याची सोय कोल्हापूर शहरापासून ५ किमी अंतरावर असलेल्या वळीवडे कॅम्पमध्ये केली होती.

त्या ठिकाणी निर्वासितांना राहण्यासाठी बरॅक करण्यात आले होते. दोन खोल्या, स्वयंपाक घर, स्नानगृह व व्हरांडा असे घर बांधून दिले होते. त्यांना लागणाऱ्या दैनंदिन जीवनावश्यक वस्तूही पुरवल्या होत्या. पाच हजार पोलिश निर्वासित १९४३ ते १९४८ असे पाच वर्षे वळीवडे येथे राहात होते.

 

या वास्तव्यात पोलिश निर्वासितांनी वळीवडेतील रस्त्यांना पोलिश नावे दिली होती. एक शाळा, दवाखाना, चित्रपटगृह व चर्चही उभे केले होते.

मात्र दुसऱ्या महायुद्धाच्या समाप्तीनंतर हे निर्वासित आपल्या मायदेशी निघून गेले होते. कोल्हापूरकरांनी दिलेले प्रेम आजही हयात असलेले निर्वासित व त्यांच्या पुढची पिढी विसरलेली नाही.

पोलंड देशाकडून छत्रपती संभाजीराजे यांना बेणे मेरितो पुरस्कार
युवराज संभाजीराजे छत्रपती यांना पोलंड देशाकडून छत्रपती संभाजीराजे यांना बेणे मेरितो पुरस्कार देऊन सन्मानित केले गेले. पोलंड देशाच्या नागरिकांना अथवा पोलंड देशाला सहकार्य केलेल्या इतर देशातील नागरिकांना पोलंड देशाच्या परराष्ट्र मंत्रालयामार्फत हा पुरस्कार प्रदान केला जातो.


दुसऱ्या महायुद्धादरम्यान पोलंडच्या 5000 निर्वासित नागरिकांना कोल्हापूरच्या छत्रपती घराण्याने आसरा दिला होता. 2019 साली या घटनेस 70 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने संभाजीराजे छत्रपती यांनी पुढाकार घेऊन या कॅम्पमध्ये राहिलेल्यापैकी हयात असणाऱ्या नागरिकांना व त्यांच्या कुटुंबीयांना राज्य अतिथी म्हणून याठिकाणी निमंत्रित करून वळीवडे पोलंड कॅम्पच्या स्मृती जगविण्यासाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते. 14 सप्टेंबर 2019 रोजी झालेल्या या कार्यक्रमात पोलंडचे उप परराष्ट्र मंत्री मार्सिन प्रझिडाक आणि भारतातील पोलंडचे राजदूत ऍडम बुराकोव्स्की यांच्या हस्ते 1942 ते 1948 या काळात येथे वास्तव्य करणाया या पोलिश कुटुंबांच्या आणि नागरिकांच्या स्मरणार्थ एक स्मृतीस्तंभाचे अनावरण आणि संग्रहालयाची पायाभरणी करण्यात आली होती.

७२ वर्षे जपलीय कोल्हापूरची बांगडी

८३ वर्षीय लुडमिला जॅक्टोव्हीझ , त्या ११ वर्षांच्या असताना वळीवडेत आल्या होत्या. त्यांच्या आईने त्यांना दोन बांगड्या घातल्या होत्या. ती बांगडी आठवण म्हणून त्यांनी जपली आहे. कोल्हापुर व शाहू महाराजांच्या भूमीची आठवण म्हणून ही बांगडी ७२ वर्षे जपली आहे.

अतुल मुळीक
इतिहास अभ्यासक,
सांगली.

Leave a Comment

error: कॉपी नका करू. लिंक शेअर करा.