कर्नाटक राज्यातील हवेरी जिल्ह्यात गुट्टाला येथील चंद्रशेखर मंदिराजवळ सापडलेल्या एका शिल्पलेखात इसवी सन 1539 मध्ये दुष्काळामुळे 6,307 लोकांच्या मृत्यूची नोंद आहे, ज्यामुळे हा भारतातील नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या मानवी संकटाचा पहिला ऐतिहासिक दस्तऐवज ठरला आहे. हम्पी येथील राज्य पुरातत्व विभागाचे संचालक आर. शेजेश्वर यांनी शोधलेला हा एक महत्त्वाचा शिलालेख ठरतो. पुरातत्व सर्वेक्षण (एएसआय) चे संचालक (शिलालेख) के. मुनिरत्नम रेड्डी यांच्या मते, हा शिलालेख शके 1461, विकारी, भाद्रपद शु. 5, म्हणजेच 18 ऑगस्ट 1539 सीई चा आहे.
शिलालेख कन्नड भाषा आणि लिपीत आहे आणि यात दुष्काळामुळे झालेल्या या दुर्घटनेची गंभीर नोंद आहे, ज्यामुळे तो भारतीय इतिहासातील शिलालेखाद्वारे नोंदवलेल्या मोठ्या नैसर्गिक आपत्तींपैकी एक ठरतो. दगडी शिळेवर कोरलेल्या या शिलालेखात असे नमूद आहे की, दुष्काळामुळे (कन्नडमध्ये ‘बारा’ म्हणून ओळखले जाते) 6,307 लोकांचा मृत्यू झाला. गुट्टावलाल येथील नानीदेव ओडेया यांचा मुलगा मारुलैया ओडेया याने तिम्मरस स्वामी, या सीमेचा (प्रादेशिक विभाग) शासक, बसवेश्वर देवाच्या चरणी नतमस्तक होऊन, मृतदेह टोपल्यांमध्ये घेऊन जाऊन दफन केले. शिलालेखासोबत एक शिल्प आहे, ज्यामध्ये एक व्यक्ती — बहुधा मारुलैया ओडेया — डोक्यावर दोन किंवा तीन मृतदेह असलेली टोपली घेऊन जात असल्याचे दाखवले आहे.
हा शिलालेख दुर्मिळ आहे आणि दुष्काळामुळे झालेल्या मानवी नुकसानाची स्पष्ट नोंद करतो. गुट्टाला येथील शिलालेखासारखे शिलालेख त्या काळातील सामाजिक-आर्थिक परिस्थितीची जाणीव करून देतात, जी साहित्यिक ग्रंथांमध्ये बहुतेक वेळा आढळत नाही. तुलनात्मक अभ्यासाद्वारे, समाजाने अशा आपत्तींना कसे तोंड दिले याचा अंदाज घेता येऊ शकतो. मुनिरत्नम यांच्या मते, विविध क्षेत्र आणि कालखंडातील अशा शिलालेखांचा व्यापक अभ्यास केल्यास नैसर्गिक आपत्तींचा ऐतिहासिक प्रभाव आणि त्यांना मिळालेल्या प्रतिसादांबद्दलची आपली समज अधिक गहरी होऊ शकते. यामुळे संशोधकांना हवामानाच्या नमुन्यांचा मागोवा घेण्यास मदत होऊ शकते, तर विद्वानांना प्रशासकीय कृती किंवा लोकसंख्याशास्त्रीय बदलांचे तपशील शोधता येतील.एएसआयच्या शिलालेख शाखेने 2024-25 मध्ये भारतभर, जंगलांच्या खोल भागांसह, 1,000 हून अधिक शिलालेख शोधले आणि त्यांची प्रतिलिपी केली. या वर्षी आतापर्यंत 100 हून अधिक शिलालेख सापडले आहेत, ज्यामुळे भारताच्या इतिहासाचे पुनर्रचना आणि समजून घेण्यासाठी शिलालेखशास्त्राचे महत्त्व अधोरेखित झाले आहे.
मराठी अनुवाद –
श्री. सतीश सोनवणे
इतिहास अभ्यासक
(अहिल्यानगर )
संदर्भ: The Hindu